बहुजन नायक कांशीराम
Bahujan Nayak Kanshiram
बहुजन नायक कांशीराम - बापू राऊत
आंबेडकरवाद हा सरळ सरळ दैववादावर हल्ला करतो.अंधश्रध्देला नेस्तनाबूत करण्याचे काम करुन तो विज्ञनवादाला कवटाळण्याचे आवाहन करतो. आज अनेक दलित चिंतक,साहित्यिक, राजकीय नेते स्वत:ला आंबेडकरवादी म्हणवून घेत असतात. परंतु आंबेडकरवादाच्या विरोधात दैववादावर विश्वास ठेवतात. रोज देवदेवतांची पुजाअर्चा करतात, अंधश्रध्दा पाळतात परंतु व्यासपीठावरुन भाषण करताना मात्र दैववादावर व अंधश्रध्देवर बेछूट हल्ला करतात व व्यव्हारात मात्र त्याच्या एकदम उलट वागतात. अशांना आंबेडकरवादी म्हणावे काय ? महाराष्ट्रातील अनेक दलित नेते व आंबेडकरवादी दैववादी आहेत. काही दलित नेते व साहित्यिक मंदिरात जातात व तेथील मुर्तीच्या पाया पडतात.काही जण घरात सत्यनारायणाच्या पुजा घालतात तर काही आपल्या मुलामुलींचा ब्राम्हणाकरवी मुंजा करतात व वरुन स्वत:ला आंबेडकरवादी बौध्द म्हणवून घेतात. तर दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला स्वाभिमानाने ताठ मान करुन जगण्याचे हक्क दिले. त्यामुळे आम्ही कोणाचेही मानसिक गुलाम नसून आम्ही आमच्या चळवळी स्वाभिमानाने चालवू अशा बाता करणारे आमचे भाषण बहाद्दर नेते व साहित्यिक विचारवंत प्रस्थापितांचे राजकीय व शैक्षणिक गुलाम म्हणून वावरतात.अनेकजन वर्षभर सामाजीक परीवर्तनाच्या करतात, प्रस्थापितावर, गांधीवाद्यावर व संघवादी विचारधारा राबविणाऱ्या भाजपा व शिवसेनेवर टिका करतात परंतु हेच लोक निवडणूकीच्या काळात कांग्रेस, भाजपा व राष्ट्रवादी पक्षाबरोबर ऊठबस करतात, त्या पक्षांचा प्रचार करीत मतांची भीक मागत फिरताना दिसतात. तर राजकारणासी आमचे काही देनेघेने नसून केवळ धर्म व समाजकारणात रुची आहे असे म्हणनारे महाभाग बुध्दविहार मतांच्या ( व्होट ) मोबदल्यात प्रस्थापित राजकीय पक्षाकडून मिळणाऱ्या भीकेतन उभी करीत असतात.